( कारण सगळी सोंगं करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही.) - डॉ. गिरीश जाखोटिया.


नमस्कार मित्रांनो ! आम्ही नेहमीच म्हणतो, "दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा !" यावर आता थोडं व्यावहारिक बोलूयात. आनंदाच्या तत्त्वज्ञानावर जगभरात आणि आमच्याकडेही खूप लिहिलं, बोललं व दाखवलं जातं. "आनंद मानण्यावर असतं" हे अर्धसत्य आहे. स्वतःजवळ "किमान" धनही नसताना सातत्याने आनंद मानत रहाणं अवघड असतं. या आनंदी मानसिकतेसोबत आम्ही आमचं अर्थार्जनही वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. "ठेविले अनंते तैसेचि रहावे, चित्ती असो द्यावे समाधान", हे एका मर्यादेपर्यंत ठीक आहे. पर्याप्त अर्थार्जनाला पर्याय हा नसतोच. आता "पर्याप्त" म्हणजे किती, हे प्रत्येकाने आपापल्या विवेकानुसार ठरवावे, अन्यथा कुत्तरओढ होते !
आर्थिकदृष्ट्या संपन्न असणारे लोक व त्यांचे समाज अर्थार्जनासाठी कायकाय करतात हे भावना बाजूला ठेवून तार्किकद्रुष्ट्या पहा. दसऱ्याच्या निमित्ताने अर्थार्जनासाठी पाच महत्वाच्या गोष्टी इथे नमूद करू इच्छितो. पटल्या तर घ्या नाहीतर सोडून द्या!

.     अस्मिता जपणे आणि आपापले सांस्कृतिक कार्यक्रम करणे, हे महत्वाचे आहेच. पण या गोष्टींसाठी स्वतःच्या वेळेचं, श्रमाचं आणि पैशांचं बजेट ठरवा. अर्थार्जनासाठी कुवत आणि वेळ लागतो. लक्षात ठेवा, सांस्कृतिक वा राजकीय पुढाऱ्यांच्या भाषणांचे कार्यक्रम सुध्दा उद्योगपतींच्या पैशाशिवाय होत नाहीत. तेव्हा इतरांचे झेंडे उचलताना वा इतरांसाठी सतरंज्या टाकताना हे नेहमीच लक्षात ठेवा की "आपली आर्थिक औकात क्षीण होत नाहीय ना ? अर्थार्जनासाठी आपण आपली कुवत सुधारायला वेळ देतो आहोत ना ?" अस्मितांवर लढायला वा मरायला लावणारे स्वतःची आर्थिक तजवीज मात्र भक्कम करून ठेवत असतात.

२.     अर्थार्जनासाठी भावनिक तडजोडी कराव्या लागतात. प्रसंगी अपमान गिळून पुढे जा. स्वाभिमानापायी तुटू नका. वाकण्याचं सोंग करून वेळ निभावून न्या. अर्थार्जनावर "फोकस" हवा. लढाई जिंकून तहात हरू नका. "Give & Take" ची लवचिकता ठेवा. व्रुथा अभिमानामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होऊ शकते. पैसा नसताना फुकाचा अभिमान दाखविण्याची बाब ही या व्यावहारिक जगात हास्यास्पद ठरते व कुटुंबियांसाठी क्लेशदायी असते. छोट्या मतभेदांना मोठं करु नका. ग्राहक हुशार आहे आणि तुम्ही त्याचं ऐकायला उत्सुक आहात, असंच त्याला सातत्याने वाटलं पाहिजे.


३.     अर्थार्जनावर फोकस ठेवताना श्रद्धांचा अतिरेक करू नका.अंधश्रद्धांना निष्ठूरपणे टाळा. अंधश्रद्धांचाही अंतिमतः व्यापारच केला जातो. आर्थिक व्यवहार करताना "उपयोगिता" बघा. यासाठी मन टाळा, मेंदू वापरा. श्रद्धांसाठी देणगी देताना अतिरेक न करता आपल्या मुलांचं भवितव्य डोळ्यांसमोर आणा. लक्षात ठेवा, धनिक लोक धार्मिक वा अध्यात्मिक प्रक्रियांना एका मर्यादेतच वेळ देतात. (किंबहुना धनाचा वापर करीत ही मंडळी स्वतःसाठी अध्यात्मिक प्रक्रिया कंत्राटाने राबवून घेतात !) क्षणिक मिरवण्यासाठी देणगी देण्याबाबतीत धनाढ्यांशी स्पर्धा करू नका. स्वर्ग इथेच आहे, तो इथेच शोधा वा निर्माण करा !

४.     अर्थार्जनासाठी आपल्या मतलबावर लक्ष ठेवा. आपली संधी कुणी हिरावून घेता कामा नये. प्रत्येक नव्या संधीकडे सजगपणे, धाडसाने, संयमितपणे व हिशोबीपणे पहा. स्वतःकडील शंभर रूपयांपैकी अधिकाधिक दहा ते पंधरा रुपयांचा धाडसासाठी उपयोग करा. आपल्या गाठीशी पुरेसे पैसे असलेच पाहिजेत. संयम बाळगा. कुणी हरभऱ्याच्या झाडावर चढवतय म्हणून प्रचंड धोका पत्करण्याचा वेडेपणा करू नका. आश्वासनांना, आमिषांना बळी पडू नका. कोणताही आर्थिक व्यवहार करताना भरपूर प्रश्न विचारा, शंकांचं निरसन करून घ्या. एवढं करूनही व्यवहार करायचा नसेल तर संकोच न करता, न घाबरता सरळ नाही म्हणा. अस्थायी चांगुलपणा दाखवून नुकसान स्विकारु नका. लोक म्हणतील, "काय निर्लज्ज माणूस आहे". लोकांना बोलू द्यात. ते बोलतच रहातात. तुम्ही अर्थार्जनाकडेच लक्ष द्या. स्वतःच्या सेवेचं, कौशल्याचं, वस्तूचं मूल्य ओळखा. गंडवणारे खूप असतात. बाजाराचा अभ्यास करा आणि आपली किंमत ठणकावून वसूल करा.

५.     कोणाच्याही संपत्तीने दिपून जाऊ नका. तुम्ही तुमच्या गरजांचा, जीवनपध्दतीचा आणि संयुक्तिक अर्थार्जनाचा विचार करा. एखादा खूप श्रीमंत असतो म्हणजे तो आपल्यापेक्षा जास्त हुशार, कर्तृत्ववान असतो; ही न्यूनगंडाची भावना दूर सारा. तुम्ही "तुम्ही" आहात. मी बरेच उद्योगपती सातत्याने अस्वस्थ राहिलेले पाहिले आहेत. अर्थात ह्यांच्या अस्वस्थपणाची बहुतेक कारणे ही "आ बैल, मुझे मार" सारखी असतात. अशा निरूपयोगी श्रीमंतांकडे न पाहता स्वतःचा उत्तम मित्रपरिवार बनवा. हे मित्र जिवाभावाचे असावेत जे अडचणीत आर्थिक मदत करतील वा मानसिक आधार देतील. सतराशेसाठ मित्र सांभाळण्यासाठी खूप वेळ व ऊर्जा खर्च करावी लागेल. मग अर्थार्जन केव्हा करणार ?


चला, ग्यान खूप झालं. गरिबांचं सक्रीय समर्थन करा, गरिबीचं नाही. मित्रांनो, हे माझे अनुभवाचे बोल आहेत. थांबतो इथे. माझं अर्थार्जन आता बोलवतय मला !